स्वप्नारंभ !
मला पडलेली स्वप्नें आणि मी पाहिलेली स्वप्ने यात फरक असतो हे खरेच. पण पडलेली स्वप्नेंही झोपेत का होईना आपण पाहत असतोच ! गंमतीचा भाग सोडून आपण या ब्लॉगवर पडलेली स्वप्नेंच विचारात घेऊ. स्वप्ने रात्रीच्या झोपेतच पडतात असे नाही, तर ती दिवसा तुम्ही झोपला असाल तरीही पडतात ! स्वप्ने तशी बालपणीच पडायला सुरुवात होते. स्वप्नेच पण किती त-हेत-हेची पडतात. बरी वाईट स्वप्नेच आपले जीवन व्यापून टाकतात. स्वप्नांत आपण कधी राजा असतो तर कधी भिकारी ! कधी आपल्यामागे कोणीतरी लागलेले असते तर कधी आपण कुणाच्यातरी मागून धावताना दिसतो. कधी स्वप्नांत देवदेवता तर कधी राक्षस, जंगली प्राणी दिसतात. अगदी हिमालयातल्या तरीदेखील स्वप्नांत दिसतो ! कधी आपण उंच कडे जात असतो , तर कधी उंच ठिकाणावरून घसरतांना दिसतो ! कधी स्वप्नांत साप दिसतात. कधी पैसे, पुरलेले धन दिसते. कधी चांगली स्वप्ने तर कधी भयंकर स्वप्नेच पडतात. मला पडणारी स्वप्नें बरेचदा भयानकच असतात ! इतकेच नाही ; तर मला पडणारी किती तरी स्वप्नें प्रचिती देऊन गेली आहेत ! स्वप्नांनी माझी पाठ आजही सोडलेली नाही ! अगदी कोरोनाच्या ह्या संपूर्ण कालावधीतही स्वप्नांनी माझा पिच्छा सोडलेला नाही. माझ्या इतर ब्लाॅगवरील स्वप्नांच्या लिंक्सही मी वेळोवेळी देणार आहे. मला पडलेली आणि पुढेही पडणारी अशी अनेक स्वप्नें मला तुम्हांला सांगायची आहेत. ती तुम्हांला कशी वाटतात, तुम्हांलाही स्वप्नांचे असे काही अनुभव आले आहेत का, तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा.
इतकेच नाही तर माझ्या उघड्या डोळ्यांवर काही माणसे, आकृत्या आणि घटना तरळतात. कधी कधी तर काही सेकंद त्यांच्याशी माझी लिंक जुळते आणि अचानक तुटतेही. यावरही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून भाष्य करा.
आता इथून पुढे आपण मला पडलेली व पडणारीही बरीचशी भयानक स्वप्नें पाहणार आहोत. काही इतरांची ऐकलेली स्वप्नेंही अंतर्भूत करणार आहे. तेव्हा श्वास रोखून धरा.
आणखी एक गोष्ट. मला सगळ्याच स्वप्नांची प्रचिती येतेच असे नाही. पण मला एक खात्री आहे.मला पडलेल्या प्रत्येक स्वप्नाची प्रचिती जगात कोणाला ना कोणाला आलीच असणार. पुढेही येत राहील. माझी स्वप्नें वाचतांना तुम्हांला जर अशी प्रचिती आली असल्याचे आठवले , तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा.
No comments:
Post a Comment