. पडलेली स्वप्नें

Tuesday, July 6, 2021

ते मला उघड्या डोळ्यांनी दिसलं

 ते मला उघड्या डोळ्यांनी दिसलं  !


11 जानेवारी 2018


खरेच सांगतो , ही कपोलकल्पित कहाणी नाही ! माझ्या दुस-या ब्लाॅगवर मी इंग्रजी भाषेत यापूर्वी या  विषयावर लिहिले आहेच . काल म्हणजे 10 जानेवारी 2018 रोजी रात्री साडेदहाच्या दरम्याने मी अगदी जागा असतांना आणि पत्नीशी बोलत असतांना माझ्या डोळ्यांसमोर जे दिसले , त्याची प्रचिती दुस-या दिवशी दुपारी सव्वा तीन वाजता आलेल्या फोनमुळे आली ! हा विषय तसा थोडा विचित्रच आहे . सुरूवातीला तरी मलाच विचित्र वाटला होता ! तसे हे सारेच अविश्वसनीय आहे ! माझाही यावर विश्वास बसला नव्हता ! किमान मला पूर्ण जागेपणी , उघड्या डोळ्यांनी काही घटना घडत असतांना दिसतात ! काही माणसे , काही ठिकाणे बसल्या ठिकाणी दिसतात ! नंतर त्या घटना प्रत्यक्षात जशाच्यातशा किंवा थोड्याफार बदलाने घडतात !  !  अगदी अलिकडच्याच दोन घटना पहा . त्यानंतर 11 जानेवारी 2018 रोजी काय घडले ते सांगतो  !


पहिली घटना : पाद्री , नन , क्राँसचा अर्थबोध 


2017 च्या डिसेंबर महिन्यात मी आजारी पडल्याने मला एका हाँस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते . सकाळची वेळ होती . सलाईन लाऊन नर्स गेली होती . माझी पत्नी माझ्याशी बोलत होती . अशक्तपणामुळे मी डोळे मिटून बोलत होतो . अचानक मला आमच्या स्पेशल रूममध्ये पाद्री , नन आणि काही जण क्राँस घेऊन आलेले दिसले . माझ्या ऊशाशी त्यांनी क्राँस ठेवला आणि मी डोळे उघडून पाहिले तर तिथे फक्त माझी पत्नीच होती . मी दरवाजाकडे बघितले तर दरवाजा चक्क बंद होता ! मी पत्नीला ह्या चमत्कारिक  देखाव्याबद्दल सांगितले . तेवढयातच  वरच्या मजल्यावर जाणा-या जिन्यावर दाणदाण असे पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले ! पाच मिनिटांनी चक्क प्रार्थनेचे शब्द माझ्या कांनी पडले ! डावीकडच्या खिडकीतून पाहिले तर त्या दिशेने वरच्या मजल्यावरून ते शब्द येत होते . तेव्हा मला मघाचच्या पाद्री , नन , क्राँसचा अर्थबोध झाला  ! हे तसे लगेचच आलेले प्रत्यंतर ! मात्र ,  दुस-या दिवशी दिसलेल्या घटनेचे प्रत्यंतर दोन तीन दिवसांनी आले !


दुसरी घटना : जगातला मोस्ट वाँटेड अतिरेकी 


 ती घटना जबरदस्त आहे आणि जगाच्या चिंतेत भर घालणारी आहे !  त्या दिवशीही मला सलाईन लावलेलेच होते. मी आणि माझी पत्नी बोलत होतो . दुपारची वेळ होती . बोलणं थांबलं . मी क्षणभर डोळे मिटले ...आणि मला जे दिसले ते फार भयानक होते ! माझ्या रूमच्या समोरच्या रूममधून एक जगभरात मोस्ट वाँटेड असलेला अतिरेकी बाहेर पडतांना दिसला ! त्याची पँसेजमध्ये पडणारी पावले मी पाहिली ! पिवळसर सफेद झब्ब्यातल्या त्याला मी स्पष्ट पाहिले ! अवघ्या काही फुटांवरून चालतांना !  त्याच्या चेह-यावर गूढ स्मित होते ! मला या स्मिताचा अर्थ दोन तीन दिवसांनी तो त्याच्याच देशाच्या नजरकैदेतून सुटल्याची बातमी टीव्हीवर पाहिली , तेव्हा कळला ! माझ्या पत्नीलाही या प्रकाराने धक्काच बसला ! पुढे होणा-या घटना मला आधी अगदी जागेपणीसुध्दा दिसतात , यावर आता तिचाही विश्वास बसू लागला होता !


तर पहिल्या परिच्छेदातली ताजी घटना सांगतो . 10 जानेवारी 2018 ला मी माझ्या एका काकांच्या घरात एका खोलीत उभा दिसलो . वेळ रात्री 08 ते 09 ची असावी .  माझ्यासमोर माझे काका अंथरूणावर बसलेले आणि त्यांचे कुटुंबीय अंथरूणात आडवे झालेले दिसले . मी तिथे गेलो तेव्हा ते आपसात बोलत असावेत . मला एवढेच दिसले की माझे काका माझ्याकडे कटाक्ष टाकीत आहेत . ते खूप बारीक झालेले माझ्या लक्षात आले आणि माझी लिंक तुटली . प्रत्यक्षात माझ्या त्या काकांचे निधन होऊन दोन वर्षे झालेली आहेत . मयत काका जिवंत परंतु अतिशय बारीक  दिसले . असं कसं दिसलं असावं , याबद्दल माझी व पत्नीची चर्चा झाली आणि स्मरणकेंद्रात पडून राहिलेल्या काही घटना अशा अचानक डोळयासमोर तरळतात , असे आम्ही दोघेही म्हणालो . मला पटत नसूनही झोप महत्वाची असल्याने मी चर्चेला पूरणविराम देऊन झोपी गेलो . पण मला काही तरी खटकत होते . मला भीती वाटत होती . काही तरी होणार , अशी मी मनाशी खूणगाठ बांधली होती . झालेही तसेच . मात्र मी शहरामध्ये माझ्या कामात काहीसा व्यस्त असल्याने मी काहीसा गाफील झालो होतो . पण घडणारे घडलेच होते . दुपारी 03.15 ला मला माझ्या एका शेजा-याचा फोन आला . बातमी वाईट होती . माझ्या मित्राच्या पत्नीचे निधन झाले होते ! काल डोळयासमोर मयत काका जिवंत दिसले होते आणि आज जिवंत वहिनी मयत झाली होती . ती नेमकी त्या काकांच्या मागच्या बाजुच्या लगतच्या घरातलीच ! ती बरीच वर्षे आजारीच होती आणि खूप बारीकही झाली होती ! माझ्या मनात ते काकांचे बारीकपण घोळू लागले आणि सगळी उकल झाली ! मी माझे काम गुंडाळले आणि तडक मित्राचे घर गाठले !

Tuesday, June 29, 2021

स्वप्नं २ ( #dream2 )

 दि. 07.04.2020 रोजीचे विचित्र स्वप्नं

     

     प्रत्यक्ष स्वप्नं : 

       हे कोरोनाच्या सुरूवातीच्या काही महिन्यांच्या काळातले स्वप्नं आहे. 

     आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा चौदावा दिवस सुरू झाला . आज मंगळवार. आज पहाटे विचित्र स्वप्नं पडले. मागच्या दारी असलेला परिसर दिसला. पण तो माझ्या बालपणीचा. त्यावेळी घरात आणि अंगणातही सिमेंटकाँक्रीट नव्हते. सर्वत्र मातीच होती. मागच्या अंगणात पश्चिमेच्या गडग्यापासून तीन चार फुटाचा मातीचा भराव टाकलेला होता. प्राथमिक शाळेत आम्हांला पैशाचे झाड नावाचा धडा होता. माझ्या काही बालमित्रांनी मातीत काही पैशांची नाणी त्यांचे झाड होईल या भाबडया कल्पनेने ठेवली होती. मीही माझ्या मागील दारच्या त्या मातीच्या भरावात दहा पैशाचे एक नाणे रूजत घातले होते ! खरेच, त्यावेळी किती निरागस होतो आम्ही ! तर स्वप्नात तो मातीचा भराव , तो मागील दारचा जुुना परिसर , ते जुने घर आले.  मी भरावाच्या दक्षिणेला असलेल्या केळीच्या झाडाजवळ उत्तरेकडे तोंड करून उकीडवा बसलेला असतो. तिथे मी कसा गेलो, खाली बसून मी काय करीत होतो , हे मला त्या स्वप्नातही समजलेले नाही. तर मी उत्तर दिशेला तोंड करून समोरच्या मातीकडे बघत असतानाच मातीमध्ये चर खणलेला किंवा खड्डा पडलेला दिसला व त्यावर मध्येमध्ये अंतर ठेवून तीन चिरे ठेवलेले असतात. त्यापुढे मात्र तो चर दोन भागात विभागलेला असतो. एक फाटा वायव्येकडे तर दुसरा फाटा ईशान्येकडे गेलेला दिसतो. हे दोन्ही फाटे गडग्यापर्यंत गेलेले असतात. म्हणजे माझ्यापासून साधारण पाच सहा फूट लांब. त्या चरात पाणी भरतांना दिसते. त्यात छोटया लाटा उठतात. नदीच्या पात्रातल्या लाटांसारख्या . पाण्याला अचानक वेग येतो आणि ते एकदा वायव्येला , एकदा दक्षिणेकडे तर एकदा ईशान्येकडे या क्रमाने मागे पुढे फिरत राहते. तीन ठिकाणी फिरणारे ते पाणी अन्यत्र कुठेही जात नसते. आश्चर्य म्हणजे लाटा असूनही व पाण्याला वेग असूनही पाणी त्या चराच्या वर येत नव्हते. ही मर्यादा त्याला कोणी घातली होती ? पाण्याचे ते कसले हेलकावे होते ? पाण्याची ती कसली आंदोलने होती ? त्याला कोण दिशा देत होते ? कोण त्याची दिशा नियंत्रित करत होते ? हे मला त्या  स्वप्नातही कळले नाही आणि स्वप्नं संपल्यानंतर जागा झाल्यावरही कळले नाही. कसली विचित्र स्वप्नं पडतात मला ! एक तर माझे पोट खराब असावे किंवा त्या स्वप्नाने काही तरी सूचवले असावे. दक्षिण , वायव्य , उत्तर , ईशान्य आणि पूर्व असाही स्वप्नातील घटनांचा दिशाक्रम होता. ते पाणी ठराविक पध्दतीनेच दिशा न बदलता कसे फिरत होेते ? या दिशांना काय घडणार आहे ? की तो कोणत्या प्रांताचा नकाशा तर नसेल ना ? कोरोना हाॅटस्पाॅटसशी याचा काय संबंध असेल का ? मी टीव्ही लावला तेव्हा एका चँनेलवर मुंबईतले कोरोनाबाधितांचे हाॅटस्पाॅटस् दाखवत होते तेव्हा मुंबईचा नकाशा काहीसा स्वप्नातल्यासारखाच वाटला. 


स्वप्नाबाबत थोडे अधिक : 

कदाचित तो भासही असेल. उलटे झाले असेल. स्वप्नी वसे ते समोर भासे, असेही असेल. पण हे स्वप्नं एप्रिल २०२० मध्ये कोरोनाच्या सुरूवातीच्या काळातले आहे. त्यातही यात कोरोनाच्या किती लाटा, कोणत्या दिशांना उठतील,  त्यांचे प्रमाण किंवा तीव्रता कसे कमी जास्त होईल , विशेषत: मुंबईत काय परिस्थिती पुढे असेल , हे सूचित केलेले असावे. मी हे स्वप्नं माझ्या ' ओन्ली देवीदास ' या ब्लॉगवर त्याचवेळी पोस्ट केले आहे. 


 तुमच्यापैकी कोणाला असे काही स्वप्नं पडले असेल तर त्यांनी हया पोस्टखाली अवश्य कमेंट करावी. तुमच्यापैकी कुणाला माझ्या स्वप्नाचा अर्थ लागला तरी कळवावे , ही विनंती.

Tuesday, June 22, 2021

यतीशी कनेक्ट

 यतीसंपर्क

०६.०४.२०२०

जागेपणीच मिटल्या डोळयांसमोर दृष्य तरळले. मी कुठल्या तरी घनदाट जंगलात आहे. बहुधा हिमालयाकडील भाग असावा. मी उभा असतो तिथून दहाबारा फुटावर एका प्रचंड वृक्षाभोवती चौकोनी पार बांधलेला आहे . वृक्ष पाराच्या मध्यभागी आहे व त्यालगतच त्याच्याभोवती वर्तुळाकार माती दिसते आहे. त्या पाराला पातळ फिकट हिरवा पोपटी रंग दिलेला आहे व तो आता जुना झालेला आहे. त्या पारावर एक खूप उंच , धिप्पाड माणसासारखा दिसणारा प्राणी पूर्ण नग्नावस्थेत बसलेला असून त्याला मोठया साखळदंडांनी बांधलेले आहे. तो हातांची हालचाल करायचा प्रयत्न करतो आहे. त्याच्या डोक्यावर आणि सर्वांगावरच मोठे केस आहेत. त्याच्या नजरेत काहीतरी दिसते आहे. तो मला काही तरी सांगायचा प्रयत्न करतो आहे. कदाचित सुटका करण्यासाठी असेल. पण मला ते समजत नाहीय. आजूबाजुच्या हिरवळीच्या पार्श्वभूमीवर त्याचा मातेरी रंग आणि अंगावरचे केस उठून दिसत आहेत. मला त्याच्या मागच्या हिरवळीचा एक कोपरा खूप कोवळा व ताजा टवटवीत असलेला दिसला आणि त्याचक्षणी माझी लिंक तुटली. मी पुन्हा कनेक्ट होण्याचा प्रयत्न करूनही कनेक्ट होऊ शकलो नाही. अखेर तो प्रयत्न सोडून देऊन मी उठलोच. सौ.ला मी हे नंतर चहा पीता पीता सांगितले. माझ्या नजरेसमोर अगदी जागेपणीही अशी दृष्ये कधी कधी तरळतात आणि त्यांचा सहसा अर्थ लागत नाही पण कालांतराने प्रत्यंतर येते, हे तिला माहीत असूनही या वेळचे दृष्य तिला विचित्र वाटले. आपला पती यतीशी थेट कनेक्ट झाला होता की काय अशी शंका तिला आली आणि कोरोनाच्या उगमाशी त्या प्राण्याचा काही संबंध असावा काय अशी शंका मला आली.

Tuesday, June 15, 2021

स्वप्नं १ ( #dream 1 )

 स्वप्नं सांगायला प्रत्यक्ष सुरूवात...

           आता स्वप्नंच सांगायची तर

  अगदी लहानपणापासून सुरूवात करावी लागेल. पण आता लगेचच काही आठवत नाहीय. आपण एक करूया. तूर्त साधारणपणे वर्ष दीड वर्षांपूर्वीपासूनच्या स्वप्नांनी सुरुवात करूया. काही स्वप्नेच मी माझ्या इतर ब्लाॅगमधील काही लेखांत वेगळ्या संदर्भात नमूद केलेली आहेत, तर काही मला आठवतील तशी मी ती सांगणार आहे.  


आज मी सांगणार आहे 

    ..... ते माझ्या ओन्ली देवीदास या ब्लॉगवर कथन केलेले व दि. ०२.०४.२०२० रोजी पडलेले स्वप्नं.


 ते स्वप्नं असं आहे बघा...


         आमचा मुलगा कुठे तरी दुस-या मजल्यावरच्या खोलीच्या मध्यभागी फूलपँट आणि इनशर्ट घालून रात्रीचा डाराडूर झोपलेला असतो. त्याच्या पायाखालील भिंतीकडे एकाखाली एक असे सावंतवाडीतले मोहन सावंत व अनंत दळवी हे झोपलेले असतात. नऊ वाजता मी त्या खोलीत झोपायला जातो तर मोहन सावंत न बोलता गडबडीने उठून मुलाच्या बाजूला जाऊन झोपतात. मी त्यांनी रिकाम्या केलेल्या जागेवर झोपतो. आम्ही काहीच बोलत नाही. असे ते स्वप्नं होते.


   काय असेल त्या स्वप्नाचा अर्थ ?

      वरवर पाहता, यात काहीही विशेष असे दिसत नसले तरी स्वप्नातून जागा होतांना मी किती गोंधळलो होतो.‌ तेव्हा आणि त्यानंतरही माझ्या मनात दोन प्रश्न येत होते. स्वप्नात, मी तिथे जाताच मोहन सावंत माझ्या मुलाच्या बाजुला का जाऊन झोपले आणि दुसरी जागा असतांनाही मी त्यांच्याच रिकाम्या झालेल्या जागेवर का जाऊन झोपलो ? 


         कुणाला उत्तर देता येईल का ? 


           सांगा पाहू !

Saturday, June 12, 2021

उघड्या डोळ्यांत दिसणारं जग

 मला केवळ स्वप्नें पडतात असे नाही तर माझ्या उघड्या डोळ्यांत काही माणसे, आकृत्या, घटना तरळतात. कधी कधी तर काही सेकंद त्यांच्याशी माझी लिंक जुळते आणि अचानक तुटतेही. 


अशा काही घटना मी माझ्या इतर ब्लाॅगवर पोस्ट केल्या आहेत. त्या लेखांच्या लिंक्स मी आपल्यासाठी खास इथे देत आहे. 


१. ते मला उघड्या डोळ्यांनी दिसतं !

२. तिसरं जग



Friday, June 11, 2021

पडलेली स्वप्नें

 स्वप्नारंभ !

          मला पडलेली स्वप्नें आणि मी पाहिलेली स्वप्ने यात फरक असतो हे खरेच. पण पडलेली स्वप्नेंही झोपेत का होईना आपण पाहत असतोच ! गंमतीचा भाग सोडून आपण या ब्लॉगवर पडलेली स्वप्नेंच विचारात घेऊ. स्वप्ने रात्रीच्या झोपेतच पडतात असे नाही, तर ती दिवसा तुम्ही झोपला असाल तरीही पडतात ! स्वप्ने तशी बालपणीच पडायला सुरुवात होते. स्वप्नेच पण किती त-हेत-हेची पडतात.‌ बरी वाईट स्वप्नेच आपले जीवन व्यापून टाकतात. स्वप्नांत आपण कधी राजा असतो तर कधी भिकारी ! कधी आपल्यामागे कोणीतरी लागलेले असते तर कधी आपण कुणाच्यातरी मागून धावताना दिसतो. कधी स्वप्नांत देवदेवता तर कधी राक्षस, जंगली प्राणी दिसतात. अगदी हिमालयातल्या तरीदेखील स्वप्नांत दिसतो ! कधी आपण उंच कडे जात असतो , तर कधी उंच ठिकाणावरून घसरतांना दिसतो ! कधी स्वप्नांत साप दिसतात. कधी पैसे, पुरलेले धन दिसते. कधी चांगली स्वप्ने तर कधी भयंकर स्वप्नेच पडतात. मला पडणारी स्वप्नें बरेचदा भयानकच असतात ! इतकेच नाही ; तर मला पडणारी किती तरी स्वप्नें प्रचिती देऊन गेली आहेत ! स्वप्नांनी माझी पाठ आजही सोडलेली नाही ! अगदी कोरोनाच्या ह्या संपूर्ण कालावधीतही स्वप्नांनी माझा पिच्छा सोडलेला नाही. माझ्या इतर ब्लाॅगवरील स्वप्नांच्या लिंक्सही मी वेळोवेळी देणार आहे. मला पडलेली आणि पुढेही पडणारी अशी अनेक स्वप्नें मला तुम्हांला सांगायची आहेत. ती तुम्हांला कशी वाटतात, तुम्हांलाही स्वप्नांचे असे काही अनुभव आले आहेत का, तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. 

          इतकेच नाही तर माझ्या उघड्या डोळ्यांवर काही माणसे, आकृत्या आणि घटना तरळतात. कधी कधी तर काही सेकंद त्यांच्याशी माझी लिंक जुळते आणि अचानक तुटतेही. यावरही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून भाष्य करा. 

     आता इथून पुढे आपण मला पडलेली व पडणारीही बरीचशी भयानक स्वप्नें पाहणार आहोत. काही इतरांची ऐकलेली स्वप्नेंही अंतर्भूत करणार आहे.  तेव्हा श्वास रोखून धरा. 


     आणखी एक गोष्ट. मला सगळ्याच स्वप्नांची प्रचिती येतेच असे नाही.‌ पण मला एक खात्री आहे.मला पडलेल्या प्रत्येक स्वप्नाची प्रचिती जगात कोणाला ना कोणाला आलीच असणार. पुढेही येत राहील. माझी स्वप्नें वाचतांना तुम्हांला जर अशी प्रचिती आली असल्याचे आठवले , तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. 




ते मला उघड्या डोळ्यांनी दिसलं

 ते मला उघड्या डोळ्यांनी दिसलं  ! 11 जानेवारी 2018 खरेच सांगतो , ही कपोलकल्पित कहाणी नाही ! माझ्या दुस-या ब्लाॅगवर मी इंग्रजी भाषेत यापूर्...